'बागी 4' चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता ; 'इतक्या' कोटींचे अॅडव्हान्स कलेक्शन
मुंबई - टायगर श्रॉफचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बागी 4’ सध्या जोरदार चर्चेत आहे. दमदार अॅक्शन आणि आकर्षक कथानकामुळे प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या ‘बागी’ भागामुळे टायगरला पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर यशाची चव चाखता येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘बागी 4’ साठी प्री-बुकिंगची सुरुवात सोमवारी झाली असून, आतापर्यंतचा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बुधवारी रात्रीपर्यंत, बागी 4 ने 2.83 कोटींचं अॅडव्हान्स कलेक्शन केलं असून, ब्लॉक सीट्स धरून हा आकडा 5.26 कोटी रुपये इतका झाला आहे.

‘गणपत’ आणि ‘हिरोपंती 2’ पेक्षा अधिक क्रेझ -
2023 मधील ‘गणपत’ साठी 3 कोटींचं अॅडव्हान्स बुकिंग झालं होतं, तर 2022 मधील ‘हिरोपंती 2’ ने 5.20 कोटींचा आकडा गाठला होता. या तुलनेत ‘बागी 4’ चं अॅडव्हान्स कलेक्शन अधिक असल्यामुळे यंदा हा चित्रपट मोठा हिट ठरण्याची शक्यता आहे.
स्टारकास्ट आणि अॅक्शनची मेजवानी -
या भागात टायगरसोबत संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ट्रेलरमध्ये दिसलेली जबरदस्त अॅक्शन sequences आणि टायगर-संजय यांची जुगलबंदी यामुळे प्रेक्षकांची अपेक्षा वाढली आहे. याशिवाय, चित्रपटात हरनाज संधू, सोनम बाजवा आणि श्रेयस तळपदे यांच्या भूमिका देखील लक्षवेधी ठरणार आहेत. बागी 4’ सोबतच ‘बंगाल फाईल्स’ हा चित्रपटही त्याच दिवशी रिलीज होत आहे. मात्र, चित्रपट समीक्षकांच्या मते, या भिडंतीचा ‘बागी 4’ च्या कलेक्शनवर फारसा परिणाम होणार नाही.
साजिद नाडियाडवाला यांच्या प्रॉडक्शनमध्ये तयार झालेला ‘बागी 4’ सध्या सर्वदूर चर्चेत असून, अॅक्शनपटांच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. टायगर श्रॉफसाठीही हा चित्रपट पुनरागमनाची नांदी ठरू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




