रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू; CM फडणवीसांचा इशारा

रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू; CM फडणवीसांचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सरला बेट येथील श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 179 व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील बड्या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरला बेटाचा विकास आराखडा आणि रामगिरी महाराजांच्या कार्याबद्दल माहिती दिली. तसेच, रामगिरी महाराजांना काही लोकांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेख करत, “धमक्या देणाऱ्यांना आम्ही नेस्तनाबूत करू,” असे म्हणत फडणवीस यांनी रामगिरी महाराजांच्या अनुयायांना आश्वस्त केले.

“आमच्या मागे ही ताकद होती म्हणून आम्ही आज सरकारमध्ये आहोत. आमचे सरकार शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी काम करत आहे. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम आपण सुरू केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून 365 दिवस दिवसा आठ तास वीज देत आहोत,” असे फडणवीस म्हणाले.“काही लोक आमचे सद्गुरू रामगिरी महाराज यांना धमक्या पाठवतात. आम्ही त्यांना नेस्तनाबूत करू. आम्ही येथील कोणाच्याही केसाला हात लावू देणार नाही,” अशा शब्दांत फडणवीस यांनी इशारा दिला.

धर्माच्या नावाने कोणी अराजकता करत असेल तर सर्वांच्या पुढे मी असेन, असे सांगत फडणवीस म्हणाले की, सर्वांनी आपापल्या धर्माचे काम करावे, मात्र इतर धर्मांचाही आदर करावा.“आम्ही मुंबईतून विमानात बसलो तेव्हा मोठा समुद्र दिसत होता, मात्र आज इथे मोठा जनसमुदाय दिसत आहे. सनातन विचार अनेक वर्षांपासून जो संस्कार देत होता, तीच संस्कृती आणि वारसा आजही सुरू आहे,” असे म्हणत फडणवीस यांनी वारकरी संप्रदायाचे महत्त्व सांगितले.

“आपल्यावर आक्रमणे झाली, त्यातून बदल झाला. आक्रमणकर्त्यांनी किल्ले जिंकले आणि मंदिरं तोडली. मात्र, आमच्या संस्कृतीवर त्याचा फरक पडला नाही. वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची परंपरा आजही सुरूच आहे,” असेही ते म्हणाले.“आमची पाऊलं पंढरपूरकडे वळत राहिली. आम्ही कोणाच्या विचाराचे गुलाम झालो नाही. आजही अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून 179 वर्षांची आपली परंपरा सुरू आहे. हरिनामामुळे आपण एक होतो, जात-पात बघत नाही,” असे सांगत फडणवीस यांनी रामगिरी महाराजांच्या कार्याला वंदन केले.

सरला बेटाच्या विकासाबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले. मागील काळात आपल्या सरकारने निर्णय घेतला असून सरला बेटासाठी विकासाचा आराखडा तयार करून त्यानुसार काम केले जात आहे. भविष्यात सरला बेट हे ऊर्जेचे केंद्र बनेल आणि प्रमुख तीर्थस्थळ म्हणून सरकारकडून त्याचा विकास केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.दरम्यान, कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फुगडी खेळली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज यांच्यातही फुगडीचा खेळ रंगल्याचे पाहायला मिळाले.