वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं; जरांगेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर सरकारची मोठी चर्चा

वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं; जरांगेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर सरकारची मोठी चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असतानाच राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज ११ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मध्यरात्री उच्चस्तरीय बैठक पार पडली.

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रविंद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या आणि त्यावर सरकारकडून कोणता मार्ग काढता येईल, यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेषतः मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

 मात्र, मराठा समाजाच्या मागणीवर निर्णय घेताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, याचीही काळजी सरकारकडून घेतली जात असल्याचं समजतं. त्यामुळे दोन्ही समाजांच्या मागण्यांमध्ये समतोल साधण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. आरक्षणाचा मुद्दा यापूर्वी न्यायालयीन पातळीवरही गाजला आहे. त्यामुळे सरकारचा कोणताही निर्णय संविधानिक आणि कायदेशीर चौकटीत राहावा आणि भविष्यात न्यायालयात टिकावा, यासाठी उपलब्ध पर्यायांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे.

 दरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यामुळे सामाजिक तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सरकारकडून पुढील पावलं कोणती उचलली जातात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.