विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महायुतीत खदखद; शंभूराज देसाईंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महायुतीत खदखद; शंभूराज देसाईंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

सातारा (प्रतिनिधी) : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा-सांगली मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने या मतदारसंघातून धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली असली तरी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची नाराजी अद्याप कायम असल्याचे संकेत मिळत आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांनीही भाजपच्या भूमिकेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीस शंभूराज देसाई अनुपस्थित होते. याबाबत विचारले असता त्यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मात्र, भाजपच्या मंत्र्यांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

"पालकमंत्री म्हणून मी समन्वयासाठी पुढाकार घेतला होता. परंतु त्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही. उलट समन्वय बैठकीच्या काळातच भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करण्यात आली. अशा परिस्थितीत आम्हालाही आमची भूमिका नव्याने ठरवावी लागेल," असे देसाई म्हणाले.तसेच, सध्याची परिस्थिती निर्माण होण्यामागील कारणांचा विचार भाजपने करावा लागेल, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

दरम्यान, निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून स्थानिक लोकप्रतिनिधींना एकत्र ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना देसाई म्हणाले की, शिवसेनेच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली असून लवकरच सर्व सदस्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सदस्यांचे मत जाणून घेतल्यानंतर वरिष्ठ नेतृत्वाकडे अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय मुंबईतील पक्षश्रेष्ठी घेतील.शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि सदस्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय रणनीती निश्चित केली जाईल, अशी माहितीही शंभूराज देसाई यांनी दिली.