विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द; उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा, ‘आम्ही लढाई लढूच’

विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द; उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा, ‘आम्ही लढाई लढूच’

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं स्पष्ट केलं. ‘आम्ही ही लढाई लढूच,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर एकतर्फी कारवाईचा आरोप केला. आमच्या नगरसेवकांवर कारवाई होते, मात्र सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांवरील प्रकरणांचा निकाल का लागत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून कारवाई होत असेल, तर ज्या नगरसेवकांवर आक्षेप आहेत, त्यांच्यावरही समान कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ‘यालाच बेबंदशाही म्हणतात,’ असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

विशाखा राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 191 मधून निवडणूक लढवली होती. त्यांच्या ओबीसी जात प्रमाणपत्राबाबत जात पडताळणी समितीने निर्णय घेतल्यानंतर त्यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, MPSC परीक्षेतील कथित गोंधळावरून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच MPSC प्रकरणात जबाबदारी निश्चित करून कारवाई झाली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.