शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द
मुंबई: मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांना प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याच्या प्रकरणात अखेर त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. या कारवाईबाबत राज्याच्या नगरविकास विभागाने शुक्रवारी (दि. ०४) अधिकृत अधिसूचना जारी केली असून, येत्या सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत या निर्णयाची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. महापालिकेतील अत्यंत अनुभवी नगरसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशाखा राऊत यांचे पद रद्द होणे, हा ठाकरे गटासाठी मोठा मानला जात आहे.

उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही; प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण
पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या निर्णयाच्या आधारे मुंबई महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून अपात्रतेची कारवाई सुरू करण्याची शिफारस केली होती. या निर्णयाविरोधात राऊत यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती, परंतु न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे पद रद्द होण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. आता केवळ महापालिकेच्या सभागृहात अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असतानाच, नगरविकास विभागाने स्वतंत्र अधिसूचना जारी केली आहे.
सोमवारी सभागृहात होणार अधिकृत घोषणा
येत्या सोमवारी (दि. ०७) होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याचे औपचारिकरीत्या जाहीर केले जाईल. महापालिकेच्या चिटणीस विभागाने या घोषणेची सर्व तयारी पूर्ण केली आहे. यापूर्वी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे महापालिकेतील चार नगरसेवकांना पद गमवावे लागले आहे. विशाखा राऊत यांच्या नावाची घोषणा होताच अशा प्रकारे अपात्र ठरलेल्या नगरसेवकांची संख्या आता पाचवर पोहोचणार आहे.
दादरच्या प्रभाग १९१ मधून मिळवला होता विजय
विशाखा राऊत या दादर येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आल्या होत्या. सिद्धिविनायक मंदिर परिसर, शिवाजी पार्क आणि दादर पश्चिम हा भाग त्यांच्या प्रभागात येतो. २०१७ मधील महापालिका निवडणुकीत त्यांनी नागरिकांच्या मागासवर्गासाठी (OBC) राखीव असलेल्या जागेवरून निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. मात्र, जात प्रमाणपत्र पडताळणीत अपयशी ठरल्याने मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १६ अन्वये त्या अपात्र ठरल्या आहेत.
आगामी सहा वर्षांसाठी निवडणुकीवर बंदी
शासनाच्या अधिसूचनेनुसार, विशाखा राऊत यांना २० ऑगस्ट २०२१ पासून पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी नगरसेवक म्हणून निवडून येण्यास किंवा त्या पदावर राहण्यास अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रभाग १९१ मधील त्यांची जागा आता अधिकृतपणे रिक्त झाली आहे. यापूर्वी एमआयएमचे रोशन शेख व शमीर पटेल, ठाकरे गटाचे दीपक सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुशरा मलिक यांचे नगरसेवकपद जात प्रमाणपत्रामुळे रद्द झाले होते.
नगरविकास विभागाच्या स्वतंत्र अधिसूचनेमुळे चर्चांना उधाण
विशेष म्हणजे, यापूर्वी चार नगरसेवकांचे पद रद्द करताना नगरविकास विभागाने कोणतीही वेगळी किंवा विशेष अधिसूचना काढली नव्हती. परंतु, विशाखा राऊत यांच्या बाबतीत नगरविकास विभागाने विशेष शासन राजपत्र (Notification) प्रसिद्ध केल्यामुळे राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.




