सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात दाखल; केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केलं स्वागत, मोदींसोबतच्या बैठकीत तणाव कमी करण्यावर भर

सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात दाखल; केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केलं स्वागत, मोदींसोबतच्या बैठकीत तणाव कमी करण्यावर भर

दिल्ली (प्रतिनिधी) : १८ व्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आज भारतात दाखल झाले आहेत. जवळपास सात वर्षांनंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात महत्त्वाची द्विपक्षीय बैठक होणार आहे. २०२० मध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील सीमावादानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुरळीत करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

 चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं BRICS शिखर परिषदेसाठी भारतात आगमन झालं असून, विमानतळावर केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी त्यांचं स्वागत केलं. G-20 नंतर होणाऱ्या या मोठ्या जागतिक परिषदेसाठी जिनपिंग यांच्याआधीच जगातील अनेक प्रमुख नेते भारतात दाखल झाले आहेत.

 चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या दोन दिवसीय BRICS शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, २०२० च्या गलवान चकमकीनंतर भारत आणि चीनकडून द्विपक्षीय संबंधांमध्ये स्थिरता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहणं हीच दोन्ही देशांमधील संबंध पुढे नेण्यासाठी महत्त्वाची अट असल्याचं भारताने यापूर्वीही स्पष्ट केलं आहे.

 यापूर्वी रशियातील कझान आणि चीनमधील तियानजिन येथे झालेल्या भेटीनंतर सलग तिसऱ्या वर्षी नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची थेट भेट होत आहे. नुकत्याच बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेतही दोन्ही नेत्यांमध्ये संक्षिप्त चर्चा झाली होती. त्यामुळे आता BRICS परिषदेदरम्यान होणाऱ्या मोदी-जिनपिंग द्विपक्षीय बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं असून, भारत-चीन संबंधांमधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने कोणते निर्णय घेतले जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.