सिनेसृष्टीतील सर्वात मोठा व्हिलन, प्रकाश राजला मातृशोक

सिनेसृष्टीतील सर्वात मोठा व्हिलन, प्रकाश राजला मातृशोक

मुंबई (प्रतिनिधी) :साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार प्रकाश राज यांच्या आईचं निधन झालं आहे. सुवर्णलता असे  प्रकाश राज यांच्या आईचे नाव असून, वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 29 मार्च रोजी प्रकाश राज यांच्या आईचं निधन झालं असल्याची माहिती आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी अंतिम संस्कार करण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या आईचं निधन वयोमानानुसार होणाऱ्या आजारांमुळे झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.  

सुवर्णलता काही आरोग्याच्या निगडीत समस्यांशी झुंज देत होते. प्रकाश राज यांनीही अनेकदा आपल्या बोलण्यातून आईला ब्रेन सिस्टचा त्रास असल्याचं सांगितलं होतं. यामुळे त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. प्रकाश राज यांनी सांगितलं होतं की, ब्रेन सिस्टच्या शस्त्रक्रियेनंतर आईची स्मरणशक्ती गेली होती. त्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाही ओळखू शकत नव्हत्या. प्रकाश राज यांच्या निधनाची बातमी कळताच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी  आणि कुटुंबाने शोक व्यक्त केला.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी प्रकाश राजच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी  इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या आई श्रीमती सुवर्णलता गरू यांचे निधन झाले.याची माहिती मिळताच खूप दु:ख झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी मी प्रार्थना करतो.मी प्रकाश राज आणि त्यांच्या सर्व कुटुंबाप्रति माझ्या  मन:पूर्वक संवेदना व्यक्त करतो'. पवन कल्याण यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन शोक व्यक्त केला आहे. 

सुवर्णलता यांचा जन्म कर्नाटकातील एका गावात झाला.आयुष्याच्या खडतर प्रवासात त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. त्यांचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला. तरुणपणी त्यांनी एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम केलं होतं, अशी माहिती आहे. तिथेच त्यांची भेट आपल्या पतीशी झाली. ते रुग्णालयात उपचार घेत होते. दोघांमध्ये आधी मैत्री झाली. नंतर प्रेम फुललं. यानंतर दोघांनी मिळून संसार थाटला.या जोडप्याला तीन मुलं असल्याची माहिती आहे. या तीन मुलांमध्ये प्रकाश राज सर्वात मोठे असल्याची माहिती आहे.