सोलापुरात लक्ष्मण हाकेंसोबत अज्ञात तरुणांची झटापट; मोहोळमध्ये गुन्हा दाखल, दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं अस्त्र उगारलं असून त्यांच्या आंदोलनाचा आज 15 वा दिवस आहे. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनीही रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे.

अशातच आता या आरक्षणाच्या मुद्द्याला हिंसक वळण लागल्याचं समोर आलं आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि काही मराठा युवकांमध्ये सोलापुरात झटापट झाल्याची माहिती आहे. सोलापुरातील एका हॉटेलमध्ये लक्ष्मण हाके जेवणासाठी थांबले असताना हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके यांच्यासोबत काही अज्ञात तरुणांनी वाद घातला आणि त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. या घटनेनंतर लक्ष्मण हाके त्यांच्या गावी परतले आहेत. मात्र, त्यांचे कार्यकर्ते घटनेप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी थांबले होते. गुन्हा दाखल होण्यासाठी रात्री उशीर होण्याची शक्यता होती.
काल, 11 सप्टेंबर रोजी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे रात्री वडीगोद्रीहून सोलापूरमार्गे सांगोल्याला जात होते. यावेळी लक्ष्मण हाके आणि त्यांचे कार्यकर्ते मोहोळजवळील निसर्ग हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी लातूर जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमकही झाली.
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ संबंधित कार्यकर्त्यांना हॉटेलच्या बाहेर काढलं. त्यानंतर लक्ष्मण हाके आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते जेवण करून निसर्ग हॉटेलच्या बाहेर पडत असताना पुन्हा अचानक हुज्जत घालणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर हाके समर्थक आणि संबंधित तरुणांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. परिस्थिती पाहता पोलिसांनी तात्काळ दोन जणांना ताब्यात घेतलं असून इतर काही जण घटनास्थळावरून पळून गेल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ संबंधित तरुणांकडे असल्याची माहिती आहे. सध्या या प्रकरणाचा मोहोळ पोलीस अधिक तपास करत आहेत. मोहोळ पोलीस ठाण्यात संबंधित कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. या घटनेमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




