२१ हजार रँक असणारे विद्यार्थी ३ महिन्यांत टॉप ५० मध्ये कसे? MPSC FDA निकालावर मेहबूब शेख यांचा सवाल; निष्पक्ष चौकशीची मागणी
पुणे/मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 'औषध निरीक्षक' (Drugs Inspector) पदाच्या भरती परीक्षेवरून निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तीन महिन्यांपूर्वी इतर परीक्षांमध्ये थेट २० ते २१ हजार रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा MPSC च्या या परीक्षेत थेट पहिल्या ५० मध्ये नंबर आल्याचे समोर आले आहे. या चक्रावून टाकणाऱ्या निकालांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर आता निकालांमधील या विसंगतीमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
'या' ३ विद्यार्थ्यांच्या निकालांवरून उपस्थित झाले प्रश्न:
महबूब शेख यांनी फेसबुक पोस्टद्वारे कोणत्याही उमेदवारावर वैयक्तिक आक्षेप न घेता सत्य आणि पारदर्शकतेसाठी ३ प्रमुख उदाहरणे समोर मांडली आहेत:
1. पायल लांडे:
o Chemical Analyst परीक्षा (डिसेंबर २०२५): Rank १०,२१० (७२ गुण)
o Drugs Inspector परीक्षा (मार्च २०२६): Rank ३१
2. ऋतुजा अमृत पाटील:
o DMER Pharmacist Group C परीक्षा: Rank २१,२२२ (९४ गुण)
o Drugs Inspector परीक्षा: Rank ७ (१५५ गुण)
3. सागर रामलिंग थिटे:
o DMER Pharmacist Group C परीक्षा: Rank २१,१६० (९४ गुण)
o Drugs Inspector परीक्षा: Rank १४ (१५० गुण)
महबूब शेख यांची प्रतिक्रिया:
"तीन महिन्यांत मेहनत आणि अभ्यासाने कामगिरी सुधारू शकते, याबद्दल दुमत नाही. मात्र, अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत हजारोंच्या रँकमधून राज्यातील अव्वल क्रमांकांपर्यंत झालेला हा बदल विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. शिवाय, काही उमेदवारांचे सत्ताधारी नेत्यांसोबतचे फोटो फिरत असल्याने संशय वाढला आहे. आमचा लढा कुणा एका व्यक्तीविरोधात नसून प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आहे."
मेहबूब शेख यांच्या प्रमुख मागण्या:
· स्वतंत्र चौकशी: 'ड्रग्स इन्स्पेक्टर' परीक्षेची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी.
· फॉरेन्सिक तपासणी: गरजेनुसार डिजिटल फॉरेन्सिक, सर्व्हर लॉग्स (Server Logs) आणि तांत्रिक बाबींची तपासणी केली जावी.
· अहवाल सार्वजनिक करा: चौकशीचा अहवाल सार्वजनिक करून स्पर्धा परीक्षार्थींचा विश्वास कायम ठेवावा.




