'10 मिनिटांत महाराष्ट्र बंद झाला पाहिजे'; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा, शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. सरकार जाणूनबुजून हयगय आणि हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा रोष वाढत असल्याचं म्हटलं आहे. सरकारला 12 तारखेपर्यंतचा वेळ दिला असून, त्या दिवशी सर्व मराठा समाजाने अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबईत एका जरी तरुणाचं रक्त निघालं, तर अवघ्या 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद झाला पाहिजे, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकार जाणूनबुजून हयगय आणि हलगर्जीपणा करत आहे. त्यामुळे मराठा समाजाचा रोष वाढत आहे. सरकारकडून मराठा समाजाच्या प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण सरकारला 12 तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे. सर्व मंत्र्यांनी उपोषणाची वेळ येणार नाही, असं सांगितलं होतं. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये प्रसाद लाड यांनीही आम्हाला बोलवा, फडणवीस मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करतील, असं म्हटलं होतं. त्यामुळे लाड यांना बोलावलं होतं, मात्र एका वर्षात काहीच झालं नाही, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीसांवरही गंभीर आरोप केले. शिंदे-फडणवीसांची मिलीभगत असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे यांच्या दोन मंत्र्यांकडून आणि दोन प्रवक्त्यांकडून आंदोलन मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्याचं जरांगे यांनी सांगितलं.
मुंबईकडे निघाल्यानंतर हल्ला करून फडणवीसांना बदनाम करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. बावनकुळे आणि त्यांच्या माणसांकडूनही हेच सुरू असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. 12 तारखेला अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने मराठा समाजाने उपस्थित राहावं, असं आवाहनही त्यांनी केलं. सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधवांनी अंतरवालीत प्रत्यक्ष यावं, असं त्यांनी सांगितलं.
आंदोलकांची संख्या कमी असली तरी चालेल, मात्र 12 तारखेला सर्वांनी यावं. 10 लोक असले तरी मुंबईकडे जाणार, असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, मुंबईतील संभाव्य परिस्थितीचा उल्लेख करत जरांगे पाटील यांनी आणखी एक इशारा दिला. मुंबईत एका जरी तरुणाचं रक्त निघालं, तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद झाला पाहिजे. फडणवीसांनी डाव रचून हल्ला केला, तर 10 मिनिटांत महाराष्ट्र ठप्प झाला पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.
पोलिसांनी हल्ला केला तर आंदोलकांनी पळून जाऊ नये, मात्र चेंगराचेंगरी होऊ नये याची काळजी घ्यावी, असंही त्यांनी म्हटलं. स्वसंरक्षणासाठी आंदोलकांनी सज्ज राहावं, असं आवाहन करत त्यांनी पावनखिंडीतील मावळ्यांचं उदाहरण दिलं. मुंबईत स्वसंरक्षणासाठी सज्ज राहा, असा संदेश देताना सरकारला परिस्थिती समजत नसेल तर नाईलाज असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. त्यामुळे 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या उपस्थितीकडे आणि पुढील आंदोलनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.




