TET पेपरफुटी प्रकरण: बिहार-हरियाणातून आणखी तिघे गजाआड, अटक संख्या ७ वर; मुख्यमंत्र्यांकडून SIT चौकशीचे आदेश
भिवंडी: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी बिहार आणि हरियाणा येथून आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटमधील एकूण अटक आरोपींची संख्या आता सातवर पोहोचली आहे. या प्रकरणाच्या चौकशीची सूत्रे विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख पंजाबराव उगले यांनी स्वतः हाती घेतली आहेत.

बिहार आणि हरियाणातून आरोपी गजाआड: मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुरुवारी बिहारच्या समस्तीपूर येथून सोनूकुमार सिंह (३३) व मिथुनकुमार सिंह (३४) आणि हरियाणाच्या सोनीपत येथून कपिल कृष्णा दहिया (४१) या तिघांना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेला कपिल दहिया हा पेपरफुटीच्या आर्थिक व्यवहारासाठी भिवंडीत आला होता, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
· २७ जून: टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आले. कोनगाव पोलिसांनी एका हॉटेलमध्ये सापळा रचून सुरुवातीला तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून प्रश्नपत्रिकेचे ४ संच जप्त करण्यात आले, जे मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत होते.
· २८ जून: पेपरफुटी उघड होताच राज्य सरकारने रविवारी होणारी मुख्य परीक्षा तात्काळ स्थगित केली.
· कोट्यवधींचा कट: प्राथमिक तपासानुसार, आरोपींचा हा प्रश्नपत्रिका संच तब्बल १.५ कोटी रुपयांना विकण्याचा कट होता.
सरकारची कडक पावले; 'मकोका' लावण्याची तयारी: या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. तर दुसरीकडे, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या रॅकेटमधील दोषींवर 'मकोका'सारख्या (MCOCA) कडक कायद्यांतर्गत कारवाई करण्याची कायदेशीर चाचपणी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, भविष्यातील पेपरफुटी रोखण्यासाठी आगामी सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले जात आहे.




