अमरावतीत रुग्णालयाच्या NICU विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट; आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू, सहा गंभीर

अमरावतीत रुग्णालयाच्या NICU विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट; आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू, सहा गंभीर

अमरावती: येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास व्हेंटिलेटरचा अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा बालके गंभीररित्या जखमी झाली आहेत. काही तासांपूर्वीच जन्माला आलेल्या निष्पाप बालकांचा या दुर्घटनेत नाहक बळी गेल्याने संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



पहाटे घडली हृदयद्रावक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या NICU च्या एका कक्षात अचानक व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि पाहता पाहता आग पसरली. घटना घडली तेव्हा संबंधित कक्षात एकूण ९ नवजात बाळे उपचारासाठी दाखल होती. आगीचे स्वरूप भयानक असतानाही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत इतर बालकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. या बचावकार्यात दोन परिचारिका (नर्सेस) देखील जखमी झाल्या आहेत.

जखमी बालकांवर अतिदक्षता विभागात उपचार
घटनेची माहिती मिळताच जखमी सहा बालकांना तातडीने पुढील उपचारासाठी जवळच असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एका बाळाच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत (भाजले) झाली असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे, तर अन्य तीन बालके किरकोळ भाजली आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिली.

सुरक्षा व्यवस्थेवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह
अवघ्या एका वर्षापूर्वीच सुरू झालेल्या या नवीन इमारतीत कमी वजनाच्या व गंभीर अवस्थेतील नवजात बालकांसाठी हा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला होता. आग लागल्यानंतर रुग्णालयातील आपत्कालीन अग्निशमन यंत्रणा वेळेवर का कार्यान्वित झाली नाही? असा संतप्त सवाल आता नागरिक व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे सरकारी रुग्णालयांतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.