“आमच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नका, दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नका”; खासदार श्रीरंग बारणेंचा सुनील तटकरेंना टोला

“आमच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नका, दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नका”; खासदार श्रीरंग बारणेंचा सुनील तटकरेंना टोला

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने कुरबुरी होताना दिसत आहेत. त्याचबरोबर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे कुटुंबीयांवर टीका केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“मी दुसऱ्यांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही, दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही. सुनील तटकरेंपेक्षा लोकसभेत मी सिनिअर आहे,” असा टोला श्रीरंग बारणेंनी लगावला आहे. कर्जत येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलांना केंद्र आणि राज्य शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादावरून सध्या वाद सुरू आहे.

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत या कामांचा आढावा घेतला होता. त्यानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी याबाबत संताप व्यक्त करत राष्ट्रवादीकडून श्रेय घेण्याचं काम सुरू असल्याची टीका केली होती. यानंतर आता मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीही सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं आहे. “तटकरे यांनी आमच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नका. मी तुमच्यापेक्षा सिनिअर आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेऊ नका,” अशा शब्दांत बारणेंनी तटकरेंना सुनावलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी अनिकेत तटकरे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. अनिकेत तटकरे यांना ‘सरोगसी बाळ’ म्हणत त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून तटकरे कुटुंबीयांवर निशाणा साधला.विधानपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही अर्ज मागे घेतला नसता, तर अनिकेत तटकरे विजयी झाले नसते, असा दावा महेंद्र दळवी यांनी केला आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत दळवी म्हणाले की, “भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यामुळेच विधानपरिषद निवडणुकीत ‘सरोगसी बाळ’ जन्माला आलं.”“अनिकेत तटकरेंनी ‘सरोगसी बाळ’ म्हणजे काय, हे आधी त्यांच्या वडिलांना विचारावं. तटकरेंनी अशी किती सरोगसी बाळं जन्माला घातली आणि वाऱ्यावर सोडून दिली, हे देखील कळेल,” अशी टीका महेंद्र दळवींनी केली.

कोकणातील ही जागा शिवसेनेने लढवणे ही काळाची गरज होती. आम्ही निवडणूक लढलो असतो, तर शिवसेनेचा आणखी एक आमदार नक्कीच वाढला असता. मात्र, आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने वरिष्ठ नेत्यांचे आदेश पाळले. आमच्या माघारीमुळे सुनील तटकरेंची लढाई सोपी झाली आणि कोकणातील ‘सरोगसी बाळ’ जन्माला आलं, असंही महेंद्र दळवींनी म्हटलं.