मनसेविरुद्धच्या आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण कृष्णराज महाडिकांवर का रागावले? फडणवीसांनी सांगितलं कारण
मुंबई (प्रतिनिधी) : अमित ठाकरे यांनी पुण्यातील एका महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्यानंतर मुंबईत भाजप युवा मोर्चाकडून कृष्णराज महाडिक यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. कृष्णराज महाडिक यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घराबाहेर जाऊन अमित ठाकरे यांचा निषेध करण्याची योजना आखली होती.

मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसे आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर ठेवले. या आंदोलनावेळी मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन आणि आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. त्यामुळे तुलनेने नवख्या असलेल्या भाजयुमो आणि कृष्णराज महाडिक यांच्या तुलनेत मनसे वरचढ ठरल्याचे चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झाले. या आंदोलनानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजयुमोच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. या संपूर्ण प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचा फोटो काढल्यानंतर भाजपला नेमका किती राग आला? कृष्णराज महाडिक यांनी 24 तासांनंतर आंदोलन केलं आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण महाडिकांवर नाराज झाले. यावर तुमची भूमिका काय, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आमच्यासमोर हा प्रश्न होता की एखादा व्यक्ती बालबुद्धीने वागत असेल, तर त्यावर किती प्रतिक्रिया द्यायची? म्हणजे आपण त्या बालबुद्धीला महत्त्व द्यायचं की त्याकडे दुर्लक्ष करायचं, या संभ्रमात आम्ही होतो.”
“त्यामुळे आमच्या पक्षातील जे तरुण आहेत, त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला. मात्र आमच्यातील जे प्रगल्भ आहेत, त्यांचं मत असं होतं की लोकांना अशा गोष्टी आवडत नाहीत. ते बालबुद्धीने वागले, यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचं मत खराब होतं. लोकांना हे लक्षात येतं की हे किती बालबुद्धीने वागत आहेत,” असं फडणवीस यांनी सांगितलं. एका मर्यादेपेक्षा या प्रकरणाला महत्त्व देऊ नये, अशी भाजपची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. “त्यांनी हे प्रसिद्धीसाठी केलं, याशिवाय दुसरं कारण नव्हतं,” असं फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “आमच्या नवनाथ यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या कार्यालयातील फोटो ट्विट केला. त्या फोटोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो अशा लोकांसोबत होता की, त्याची त्या पक्षाला लाज वाटली पाहिजे.”“त्यांना प्रतिक्रिया देऊन हवी ती प्रसिद्धी द्यायची आणि त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ द्यायचे की नाही, एवढाच प्रश्न होता. मात्र या सगळ्यावर माझं स्पष्ट मत आहे की, हे वागणं अतिशय मूर्खपणाचं आहे. यापलीकडे मला यावर बोलायचं नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.




