‘अमित ठाकरे बालिश; मोदींचं नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा’; कृष्णराज महाडिकांनंतर सिद्धेश कदम आक्रमक
मुंबई (प्रतिनिधी) : भाजप आणि मनसेमधील राजकीय वाद आता अधिकच चिघळण्याची चिन्हं दिसत असतानाच, या वादात शिंदे सेनेनेही उडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे सेनेचे नेते सिद्धेश कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात प्लास्टिक रिसायकलिंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन सिद्धेश कदम यांच्या हस्ते झालं. यावेळी सिद्धेश कदम यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी ‘जेन झी’ची दिशाभूल करत आहेत, तर दुसरीकडे आम्ही भविष्यात प्लास्टिक रिसायकलिंग आणि खनिजांविषयी शाळकरी मुलांना प्रोत्साहन आणि माहिती देत आहोत, असं ते म्हणाले.
गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये मुंबईतील विविध शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्लास्टिक रिसायकलिंग शो दाखवून त्याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिद्धेश कदम यांनी अमित ठाकरे यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली. अमित ठाकरे यांचं हे वर्तन म्हणजे बालिशपणा आहे. आजच्या युवा पिढीला काय पाहिजे, हे त्यांना कळत नाही. कुठेही आक्रमकता दाखवायची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, हे विसरायचं, अशी टीका सिद्धेश कदम यांनी केली.
जगाच्या नकाशावर मोदी साहेबांचं वर्चस्व आहे. तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही पाकिस्तानमध्ये जा. तुम्ही भारतात कशाला राहता? असा सवालही सिद्धेश कदम यांनी केला. सिद्धेश कदम यांच्या या जहाल वक्तव्यामुळे भाजप आणि मनसेमधील वादाला आता शिंदे सेनेच्या आक्रमक भूमिकेचीही जोड मिळाली आहे. अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता तीन पक्षांमध्ये रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, सिद्धेश कदम यांच्या ‘पाकिस्तानात जा’ या वक्तव्यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते, तसेच अमित ठाकरे किंवा मनसेचे वरिष्ठ नेते यावर प्रत्युत्तर देतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.आगामी काळात या वक्तव्यावरून भाजप, मनसे आणि शिंदे सेनेमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.




