‘अशोक खरातसारख्या महाराजांच्या बापाचाही मी बाप’; सांगोल्यात शहाजीबापूंची फटकेबाजी, ‘ऑपरेशन टायगर’वर गोगावले काय म्हणाले?
मुंबई (प्रतिनिधी) : अशोक खरातवर आधारित ‘महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये एक घोटाळा झाल्याचा आरोप माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. अशोक खरात सांगोला तालुक्यात येऊन पूजा करून गेला. उघड्या पद्धतीने धिंगाणा घालत सांगोल्यातील जवळा येथे पूजा करण्यात आली आणि माझा भाचा अतुल पवार याचा निवडणुकीत पराभव करून त्याला जीवे मारण्याची पूजा करण्यात आली, असा दावा शहाजीबापूंनी केला.

यावेळी मी माझ्या भाच्याला सांगितलं, ‘तुझा मामा या महाराजाच्या बापाचा बाप आहे. तू मरत नाहीस, काळजी करू नकोस,’ असं शहाजी बापू पाटील म्हणाले. तसेच हा संपूर्ण प्रसंग अशोक खरातवर आधारित चित्रपटात दाखवण्यात आला आहे का? असा सवाल त्यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना केला. सांगोला येथे शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम आणि दिपाली सय्यद उपस्थित होत्या. यावेळी शहाजी बापूंनी अशोक खरातच्या कथित कारनाम्यांचा उल्लेख करत माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावरही निशाणा साधला.
दरम्यान, सांगोल्याच्या पाण्याच्या प्रश्नावरही शहाजी बापूंनी भाष्य केलं. ‘आमचं पाणी अजितदादांनी इंदापूरला पळवलं आणि पाणी वाचवण्यासाठी रक्तरंजित क्रांतीची तयारी आम्ही सुरू केली,’ असा दावा त्यांनी केला. मीडियासमोर भूमिका मांडल्यानंतर अजित पवारांचा फोन आला. ‘तुमचं पाणीच नाही,’ असं त्यावेळी सांगण्यात आलं. त्यावर कागद तुमच्यासमोर आहे, उघडून पाहा, असं आपण सांगितलं. त्यानंतर अजित पवारांनी पाणी असल्याचं मान्य केलं, असा किस्सा शहाजीबापूंनी सांगितला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोन करून असं काही करू नका, असं सांगितल्याचं त्यांनी नमूद केलं. ‘आम्हाला कुठलीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळाली नाही,’ असंही शहाजीबापू म्हणाले.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा लवकरच ‘ऑपरेशन टायगर’ होणार असल्याचे संकेत राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सांगोल्यातील शिवसेना मेळाव्यात दिले. याच मेळाव्यात त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाचेही संकेत दिले. शहाजी बापू धडपडून काम करत आहेत आणि त्यांच्या कामाचं चीज होणं गरजेचं आहे, असं गोगावले म्हणाले. ‘एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करतात, ते कुणाला कळत नाही. लवकरच राज्यात दुसरं एक ऑपरेशन आहे. आता सांगत नाही, नाहीतर मीडिया बातम्या करेल,’ असं म्हणत भरत गोगावले यांनी संभाव्य राजकीय घडामोडींचे संकेत दिले.




