एका इनोव्हा गाडीत बसतील एवढेच आमदार शिल्लक ; अतुल भातखळकरांचा सुप्रिया सुळेंना खोचक टोला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारवर टीका केली होती. या टीकेला आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "पक्षातील उरलेले आमदार आता एका टोयोटा इनोव्हा गाडीत बसतील एवढेच शिल्लक राहिले आहेत. सुप्रिया सुळेंनी आधी आपला उरलासुरला पक्ष सांभाळावा आणि जनतेची सेवा करावी," असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला.

पत्रकारांशी बोलताना भातखळकर म्हणाले, "राज्यातील जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सरकार अग्रक्रमाने काम करत आहे. विरोधी पक्ष आमच्यावर पक्ष फोडल्याचा आरोप करतो, पण पक्ष फोडायला आधी पक्षात लोक तरी उरले पाहिजेत ना!"
जरांगेंचे आंदोलन आणि परभणीतील मेळाव्यावर प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भातखळकर म्हणाले की, राज्य सरकार जरांगे यांच्याशी सतत संवादात आहे. जात पडताळणी समित्या या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करतात आणि त्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा सुरू आहे. तसेच परभणीत शिवसेना खासदार बंडू जाधव यांच्या शेतकरी मेळाव्याला जरांगेंनी दिलेल्या विरोधावर बोलताना, "शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. त्यांना पक्षाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे भातखळकर यांनी स्पष्ट केले.
रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवर भाष्य अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिलेल्या एक वर्षाच्या मुदतवाढीबाबत बोलताना त्यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. "दैनंदिन व्यवहारापुरते कामचलाऊ मराठी सर्वांना आलेच पाहिजे, हा कायदा आहे. परंतु कोणावरही जबरदस्ती न करणे हे सरकारचे धोरण आहे. या एका वर्षाच्या कालावधीत सर्व अमराठी चालक आवश्यक तेवढे मराठी नक्कीच शिकतील," असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.




