कोरे अभियांत्रिकी मध्ये पीबीएल दिन उत्साहात संपन्न
वारणा (प्रतिनिधी) : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पाधारित शिक्षण (Project Based Learning - PBL) दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी सीआयआयचे अध्यक्ष तथा स्फेरोटेकचे कार्यकारी संचालक वीरेंद्र पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या उपक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील तसेच कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांच्या हस्ते झाले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने, पीबीएल समन्वयक प्रा. एस. व्ही. निकम तसेच प्रा. एम. व्ही.जाधव, प्रा.आर डी गाडे, प्रा.आर आर चव्हाण, प्रा.एन एम शिंदे, प्रा .ए एन मलंगौडा, प्रा .ए ए पारेख, प्रा.ओ आर जंगम, प्रा.एस के जंत्रे,तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
पीबीएल दिनानिमित्त आयोजित प्रकल्प प्रदर्शनामध्ये अभियांत्रिकीच्या सर्व शाखांतील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सुमारे २००० विद्यार्थ्यांनी ३५० हून अधिक प्रकल्प गटांच्या माध्यमातून आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना व प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, समस्या निराकरण कौशल्य आणि नवोपक्रमशील दृष्टिकोनाचे उत्कृष्ट दर्शन या प्रदर्शनातून घडले.
यावेळी वारणा पीबीएल पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा वीरेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आपल्या मनोगत व्यक्त करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या प्रकल्पांचे उत्पादन विकास, उद्योजकता आणि स्टार्टअप्समध्ये रूपांतर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्री वारणा रिसर्च अँड इनोव्हेशन फाउंडेशन (कलम ८ कंपनी) मार्फत विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि स्टार्टअप क्षेत्रात पुढे जाण्यासाठी विविध प्रकारचे सहकार्य उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी विद्यार्थ्यांनी प्रकल्पाधारित शिक्षणाच्या माध्यमातून उद्योगजगताच्या गरजांशी सुसंगत कौशल्ये विकसित करावीत, असे आवाहन केले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




