कोल्हापुरात 'वाघनख्या' ऑक्टोबरअखेरपर्यंतच; या तारखेला मुंबईत होणार रवाना
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक 'वाघनख्या' आता ऑक्टोबरअखेरपर्यंत कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस संग्रहालयात प्रदर्शनासाठी असणार आहेत. कोल्हापूरकरांना हा ऐतिहासिक ठेवा जवळून पाहण्याची ही शेवटची संधी असेल, कारण त्यानंतर या वाघनख्या मुंबईकडे रवाना होणार आहेत.

लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेल्या या वाघनख्या सातारा आणि नागपूर येथील यशस्वी प्रदर्शनानंतर ३० ऑक्टोबर २०२५ रोजी कोल्हापुरात दाखल झाल्या होत्या. तेव्हापासून हजारो शिवप्रेमी आणि पर्यटकांनी वाघनख्या पाहण्यासाठी येथे गर्दी करत आहेत.
तर सहाय्यक क्यूरेटर उदय सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील प्रदर्शन संपल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी या वाघनख्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात नेण्यात येतील. मुंबईत पुढील चार महिने त्या प्रदर्शनासाठी ठेवल्या जातील आणि त्यानंतर हा ऐतिहासिक ठेवा लंडनमधील मूळ संग्रहालयात परत पाठवला जाणाराय.




