खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या आणि अरेरावीच्या घटना चर्चेत असतानाच, आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये समोरच्या व्यक्तीला गंभीर परिणामांची धमकी दिल्याचा आरोप होत असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये सुरुवातीला खासदारांचे पीए समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधतात आणि, "खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब तुमच्याशी बोलत आहेत," असे सांगून फोन जोडून देतात. त्यानंतर फोनवरील व्यक्ती संबंधित कागदपत्रे तयार करून दुसऱ्या दिवशी भेटण्यासाठी येण्यास सांगत असल्याचे ऐकू येते.
यावेळी समोरच्या व्यक्तीने आपण सध्या सोलापुरात असल्याचे सांगितल्यानंतर संभाषणाचा सूर अधिक आक्रमक झाल्याचे कथित ऑडिओमध्ये ऐकू येते. त्यानंतर शिवीगाळ केल्याचा आणि वेळेत हजर न राहिल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप या क्लिपच्या आधारे केला जात आहे.
ही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या भाषाशैलीवर आणि सार्वजनिक वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. तसेच या संपूर्ण प्रकरणावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण समोर आलेले नाही.




