फडणवीस-ठाकरे एकाच विमानात; उद्धव ठाकरे मांडवली करणार नाहीत–रोहित पवारांचा ठाम दावा

फडणवीस-ठाकरे एकाच विमानात; उद्धव ठाकरे मांडवली करणार नाहीत–रोहित पवारांचा ठाम दावा

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री मुंबईहून नागपूरला एकाच विमानाने प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

रोहित पवार म्हणाले, "हे एक कॉमन विमान होतं. एकाच दिशेने प्रवास करणारे नेते एकाच विमानात असणं हा केवळ योगायोग आहे. प्रवासादरम्यान एकमेकांची विचारपूस करणं ही सामान्य गोष्ट आहे. त्यातून वेगळे राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही."

उद्धव ठाकरे भाजपासोबत कोणतीही मांडवली करतील, अशा चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं, "भाजपाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, खासदार आणि आमदार वेगळे केले. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे त्या पक्षासोबत तडजोड करतील, ही चर्चा हास्यास्पद आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत आणि स्वाभिमानी नेते आहेत."

भाजप नेत्यांच्या सकारात्मक प्रतिक्रियांबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, "यामुळे उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे यांचीच अधिक अडचण होऊ शकते. हा प्रश्न त्यांनाच विचारायला हवा.यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या डिलिमिटेशन प्रक्रियेचाही उल्लेख केला. "हा कायदा मंजूर करण्यासाठी भाजपाला अजून अनेक खासदारांची गरज आहे. त्यामुळे सध्या मित्रपक्षांना महत्त्व दिलं जात आहे. मात्र भविष्यात राजकीय समीकरणं बदलू शकतात," असा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरे सध्या पक्ष सोडून गेलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत आहेत. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, "त्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेटणं आवश्यक आहे. त्या खासदारांच्या विजयात उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे."नागपुरात उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिल्याचाही उल्लेख करत, "लोकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. यावरून कार्यकर्त्यांच्या भावना स्पष्ट दिसून येतात," असंही रोहित पवार यांनी सांगितलं.