मराठा समाजाची अस्वस्थता वाढतेय; जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी ठोस निर्णय घ्या, बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीने त्यांच्याशी संवाद साधावा आणि उपोषण सोडवण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे.

खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रात नमूद केलं आहे की, मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट 2026 पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना वारंवार आंदोलनाचा खडतर मार्ग स्वीकारावा लागत आहे. सततच्या उपोषणामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर आणि विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय आणि प्रशासकीय पातळीवर त्यांच्या प्रकृतीकडे प्राधान्याने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
आपल्या पत्रात खासदार सोनवणे यांनी स्पष्ट केलं आहे की, हे आंदोलन केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या तीव्र भावना या आंदोलनाशी जोडलेल्या आहेत. समाजातील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती अधिक संवेदनशील होत चालली आहे.
राज्य शासनाने या प्रश्नाकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता पूर्ण गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने पाहावं, असंही पत्रात म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी थेट संवाद साधावा. तसंच, शासनाने आपली भूमिका स्पष्ट करून कायदेशीर तोडगा काढावा आणि जरांगे पाटील यांचं उपोषण तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावी, अशी विनंती खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.




