मागण्या पूर्ण होईपर्यंत उपचार घेणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा आक्रमक पवित्रा, म्हणाले ‘जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत.’
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनाची मुदतीत पूर्तता न झाल्याने जरांगे यांनी पाणी आणि सलाईन घेणं बंद केलं असून, वैद्यकीय तपासणी करण्यासही त्यांनी डॉक्टरांना मनाई केली आहे.

जोपर्यंत सरकारकडून मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत कोणतेही उपचार घेणार नसल्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. यावेळी ते म्हणाले, ‘जोपर्यंत आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नाही, तोपर्यंत मी काहीही घेणार नाही आणि उपचारही करून घेणार नाही.’ मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा अपेक्षेप्रमाणे यशस्वी न झाल्याने त्यांचं उपोषण सुरूच आहे. शिष्टमंडळाच्या आवाहनानंतर जरांगे पाणी पिण्यास आणि सलाईन घेण्यास तयार झाले होते. मात्र, आज त्यांनी पुन्हा उपचार आणि पाणी घेण्यास नकार दिला आहे.
जरांगे यांच्या मागण्यांवर एक ते दोन दिवसांत निर्णय कळवला जाईल, अशी भूमिका शिष्टमंडळाकडून मांडण्यात आली आहे. मात्र, सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील 12 तारखेला मुंबईत येण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकार आता काय निर्णय घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




