यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूच्या शस्त्रक्रियांच्या रुग्णांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टचा करार

यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूच्या शस्त्रक्रियांच्या रुग्णांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टचा करार

मुंबई (प्रतिनिधी) : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात झालेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होत असून, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांच्यात 12 फेब्रुवारी 2026 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या पहिल्याच कराराअंतर्गत राज्यातील 150 गरजू रुग्णांना दुर्धर आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना वेळेवर आणि प्रभावी वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारचे करार इतर नामांकित संस्थांसोबतही करण्याची प्रक्रिया सुरू असून, हे करार लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील 9 रुग्णांना 89 लाख 60 हजार 301 रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीतून यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या खर्चिक उपचारांचा खर्च भागवण्यास मदत झाली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून शासन, सामाजिक संस्था आणि आरोग्य क्षेत्रातील संस्थांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना या उपक्रमामुळे मोठा आधार मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. याच धर्तीवर इतरही नामांकित संस्थांसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे.

पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.