रक्षाबंधनाच्या जाहिरातीवर कंगनाचं पुन्हा भाष्य; क्रिती सेनॉनसह राहुल गांधींवरही साधला निशाणा
मुंबई (प्रतिनिधी) : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. बाबा रामदेव, क्रिती सेनॉन, तापसी पन्नू, राहुल गांधी, आशुतोष राणा आणि सोनू सूद यांच्याबाबत केलेल्या तिच्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहेत. क्रिती सेनॉनच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवर कंगनाने केलेल्या प्रतिक्रियेनंतर सनातन धर्म, हिंदू धर्म आणि महिलांनी कपडे कसे घालावेत, यावरून वाद निर्माण झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर कंगनाने सविस्तर भाष्य केलं. या सगळ्या व्यक्तींची ‘आ बैल मुझे मार’ मानसिकता असल्याचं कंगना म्हणाली. माझ्याबद्दल विचित्र वक्तव्य केलं असेल, तर त्यांच्या वक्तव्यांवर माझं काय मत आहे, हे त्यांनीही ऐकावं लागेल, असं तिने म्हटलं.क्रिती सेनॉनने कंगनाच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना ‘महिलांनी काय कपडे घालावे हे विचारणं आपण कधी बंद करणार आहोत?’ असा सवाल केला होता. यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही पोस्ट करत पुरुषसत्ताक मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केला होता.
यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने क्रिती सेनॉनवर निशाणा साधला. चित्रपटांमध्ये ती कोणतेही कपडे घालते, तेव्हा तिला कोणी रोखलं आहे का, असा सवाल कंगनाने केला. रक्षाबंधन हा धार्मिक सण असल्याने त्याच्या काही परंपरा आणि नियम असल्याचंही तिने म्हटलं.तसंच, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरही कंगनाने टीका केली. ‘रक्षाबंधन’ हा शब्द त्यांच्या विधानात का नाही? असा सवाल करत राहुल गांधी विचारांनी गोंधळलेले असल्याचं ती म्हणाली. तीन-तीन वर्षांच्या मुलींना बुरखा घातला जातो, त्यावेळी पुरुषसत्ताक व्यवस्थेबाबत राहुल गांधी आवाज का उठवत नाहीत, असा प्रश्नही कंगनाने उपस्थित केला.
दरम्यान, क्रिती सेनॉनची रक्षाबंधनाची जाहिरात मागे घेण्यात आल्याबाबतही कंगनाने भाष्य केलं. जाहिरातीत दाखवण्यात आलेल्या गोष्टींबाबत कंगनाने आक्षेप घेतला. आई-वडील, देवघर, टिळा, औक्षण, धूप-दीप यांसारख्या पारंपरिक गोष्टी जाहिरातीत का दाखवल्या नाहीत, असा सवाल तिने केला.‘सण हा प्रत्येक संस्कृतीची कलात्मक अभिव्यक्ती आहे. मग तेच करायचं नसेल, तर सण कशाला साजरा करताय?’ असं म्हणत कंगनाने रक्षाबंधनाच्या जाहिरातीवर पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.




