राहुल गांधींपासून उद्धव ठाकरेंपर्यंत विरोधक एकवटले; दिल्लीतील आंदोलनाची धग महाराष्ट्रात पोहोचणार?

राहुल गांधींपासून उद्धव ठाकरेंपर्यंत विरोधक एकवटले; दिल्लीतील आंदोलनाची धग महाराष्ट्रात पोहोचणार?

मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता विरोधकांची एकजूट अधिक मजबूत होताना दिसत आहे. राहुल गांधी रस्त्यावर उतरले, तर मुंबईतून थेट दिल्ली गाठत उद्धव ठाकरे यांनी जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या संघर्षाला पाठिंबा देत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

दिल्लीमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करत विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

याआधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ आंदोलनाचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी न करता सरकार बदलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला त्यांनी आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

आज उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये विविध विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबतही आंदोलनाच्या पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली.या बैठकीनंतर आंदोलनाला देशव्यापी स्वरूप देण्यासाठी विरोधकांमध्ये हालचाली वाढल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि ठाकरे गटाकडूनही आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, संसदेतही या मुद्द्याचे पडसाद उमटले. विरोधी खासदारांनी काळे कपडे परिधान करून सरकारविरोधात निषेध नोंदवला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला.

आता दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेला संघर्ष महाराष्ट्रात किती मोठ्या आंदोलनाचे रूप घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या राज्यातील पुढील भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

याआधीही उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. आता पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.