‘वडील का नाम’... अमित ठाकरेंवरील FIR मध्ये हिंदी शब्द; मनसेचा आक्षेप, पोलिसांकडे सुधारित FIRची मागणी

‘वडील का नाम’... अमित ठाकरेंवरील FIR मध्ये हिंदी शब्द; मनसेचा आक्षेप, पोलिसांकडे सुधारित FIRची मागणी

पुणे (प्रतिनिधी) : सध्या राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांची दुसरी फळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विविध आंदोलनं आणि मुद्दे घेऊन हे नेते लोकांमध्ये जात असल्याचं दिसत आहे. आमदार रोहित पवार, आमदार आदित्य ठाकरे किंवा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे असतील, हे तिन्ही नेते सध्या लोकांमध्ये जाऊन विविध प्रश्न आणि त्यांच्या समस्यांवर भाष्य करत आहेत.

अमित ठाकरे यांचा पुणे दौरा चांगलाच चर्चेत आला. पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांनी मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला. त्यानंतर अमित ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्याच्या FIR प्रतीमध्ये वापरण्यात आलेल्या हिंदी शब्दांवर मनसेने आक्षेप घेतला आहे.

अमित ठाकरे मुख्याध्यापकांच्या कार्यालयात उभे असताना एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असा सवाल मुख्याध्यापकांना केला.त्यानंतर मनसेचे प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे. मात्र, दाखल गुन्ह्याच्या FIR मध्ये हिंदी शब्दांचा वापर करण्यात आल्याने मनसेने आक्षेप नोंदवला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रतीमध्ये मराठीचे वावडे का? असा सवाल मनसेने केला आहे. FIRच्या प्रतीमध्ये ‘वडील का नाम’ असा शब्दप्रयोग करण्यात आल्याने मनसेने पोलिसांच्या या कृतीवर टीका केली आहे.अमित ठाकरे यांच्यावर पुणे प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या प्रतीमध्ये अर्धे हिंदी आणि अर्धे मराठी शब्द आहेत. त्यामुळे हा काय प्रकार आहे? महाराष्ट्र पोलीस कोणती ही अशुद्ध भाषा वापरत आहेत? महाराष्ट्र सरकारचं कामकाज मराठीमध्ये होणं अपेक्षित असताना ‘वडील का नाम’ असं लेखन का केलं जात आहे, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

मनसे आणि राज ठाकरे यांचा मराठीचा आग्रह सर्वश्रुत असताना जाणूनबुजून हा खोडसाळपणा गृह मंत्रालयाकडून केला जात आहे का, असा प्रश्नही मनसेने उपस्थित केला आहे. तात्काळ अशा अशुद्ध लेखन असलेल्या पत्रकात बदल करून, सुधारित भाषेसह गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.त्यामुळे आता पोलीस प्रशासन या प्रकरणात सुधारित FIR दाखल करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.