MPSC FDA-ड्रग्स इन्स्पेक्टर निकालावर नवा वाद; तीन महिन्यांत हजारोंच्या रँकवरून टॉप 100 मध्ये, मेहबूब शेखांची चौकशीची मागणी

MPSC FDA-ड्रग्स इन्स्पेक्टर निकालावर नवा वाद; तीन महिन्यांत हजारोंच्या रँकवरून टॉप 100 मध्ये, मेहबूब शेखांची चौकशीची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी काही उमेदवारांच्या निकालातील मोठ्या फरकाकडे लक्ष वेधत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मेहबूब शेख यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या FDA केमिकल अॅनालिस्ट परीक्षेनंतर अवघ्या तीन महिन्यांत झालेल्या ड्रग्स इन्स्पेक्टर परीक्षेच्या निकालात काही उमेदवारांच्या रँकमध्ये आश्चर्यकारक बदल दिसून येत आहेत. काही उमेदवार आधी हजारोंच्या क्रमांकावर असताना नंतर थेट राज्यातील पहिल्या 100 मध्ये पोहोचल्याचा दावा त्यांनी केला.

त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही उमेदवाराविरोधात वैयक्तिक आरोप नसून, हा लढा केवळ पारदर्शकता आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आहे. मेहनत आणि अभ्यासामुळे यश मिळू शकते, मात्र इतक्या कमी कालावधीत झालेल्या मोठ्या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

याशिवाय, काही उमेदवारांचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. केवळ फोटोच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येणार नाही, मात्र या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली आहे.