एकनाथ शिंदे की गणेश नाईक, सर्वात समजूतदार कोण? देवेंद्र फडणवीसांची मिश्कील प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे की गणेश नाईक, सर्वात समजूतदार कोण? देवेंद्र फडणवीसांची मिश्कील प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच चर्चेत आहे. महायुतीतील या दोन महत्त्वाच्या नेत्यांमधील वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. एका विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी या प्रश्नावर मिश्कील प्रतिक्रिया दिली. तुम्हाला समजावताना सगळ्यात जास्त समजूतदार कोण वाटतं, गणेश नाईक की एकनाथ शिंदे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला.

यावर फडणवीस म्हणाले, “दोघेही समजूतदार आहेत, दोघेही मोठे नेते आहेत. अनेक वेळा जे काही मोठे नेते असतात, त्यांच्यात समन्वय घडवून आणावा लागतो. माझ्यासारख्या छोट्या नेत्याला या दोन मोठ्या नेत्यांमध्ये समन्वय घडवावा लागेल,” अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली.दरम्यान, उद्धव ठाकरे, संजय राऊत, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, राहुल गांधी आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यापैकी सर्वात तीव्र विरोधक कोण वाटतो, असा प्रश्नही फडणवीस यांना विचारण्यात आला.यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुधीर मुनगंटीवार हे माझे विरोधक नाहीत. ते माझे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत. बाकी तुम्ही जी नावं घेतली, त्यापैकी कोणीही मला तीव्र विरोधक वाटत नाही.”

“याचं कारण म्हणजे हे फक्त मीडिया आणि पेपर टायगर आहेत. मीडिया आणि पेपरच्या बाहेर यांना विरोध करता येत नाही. नुसतं स्टेटमेंट देऊन विरोध करता येत नाही आणि नुसतं नॅरेटिव्ह तयार करूनही विरोध करता येत नाही. विरोध कसा केला पाहिजे आणि तो जनतेपर्यंत कसा पोहोचवला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे,” असं फडणवीस यांनी म्हटलं.पुढे ते म्हणाले, “आवश्यक असेल तर माझा ओरिजिनल डीएनए हा विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी कसं वागलं पाहिजे, हे शिकवण्याची वेळ आली तर मी या लोकांना निश्चितपणे शिकवू शकतो.”अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.