भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची Gen Z साठी मोठी मागणी; लोकल ट्रेनमधील 3 डबे राखीव ठेवा, रेल्वेमंत्र्यांना पत्र
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर आता भाजपने Gen Z आणि Gen Alpha या नव्या पिढीला आपल्या बाजूने वळवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद साधला होता. त्यानंतर भाजपने राज्यात स्थानिक पातळीवर तरुण पिढीला आपलेसे करण्यासाठी आणि त्यांच्या मनातील रोष कमी करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

अशातच आता भाजपच्या मुंबईतील नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी Gen Z पिढीसाठी एक महत्त्वाची मागणी केली आहे.तेजस्वी घोसाळकर यांनी महाविद्यालयात जाणाऱ्या Gen Z आणि Gen Alpha पिढीतील विद्यार्थ्यांसाठी मुंबईच्या लोकल ट्रेनमधील 12 पैकी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. पहाटे 5 ते सकाळी 11 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी हे तीन डबे आरक्षित ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात तेजस्वी घोसाळकर यांनी थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं आहे.
या पत्रात मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी लोकल ट्रेनचे तीन डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव करण्यात यावेत, असं त्यांनी म्हटलं आहे. चर्चगेट-डहाणू आणि सीएसएमटी-डोंबिवली/आसनगाव लोकल ट्रेनमध्ये विद्यार्थ्यांसाठी हे डबे राखीव ठेवण्यात यावेत, अशी मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी पत्रातून केली आहे.
सध्या मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी दोन डबे आरक्षित आहेत. याशिवाय एक प्रथम श्रेणीचा आणि एक मालवाहतूक करणाऱ्यांसाठीचा डबा राखीव असतो. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी उर्वरित डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. विशेष म्हणजे गर्दीच्या वेळी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी असा फरकही उरत नाही.
त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये आणखी तीन डबे आरक्षित केल्यास गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, फक्त विद्यार्थ्यांसाठी तीन डबे राखीव ठेवण्याची मागणी कितपत व्यवहार्य आहे, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे तेजस्वी घोसाळकर यांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तेजस्वी घोसाळकर या भाजपच्या मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक 2 च्या नगरसेविका आहेत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना निवडणुकीत उमेदवारी दिली. भाजपने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत तेजस्वी घोसाळकर या चांगल्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.




