‘महिला आरक्षणाचे जनक आम्हीच’; RSS महिलेला संघचालक करणार का? पृथ्वीराज चव्हाणांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

‘महिला आरक्षणाचे जनक आम्हीच’; RSS महिलेला संघचालक करणार का? पृथ्वीराज चव्हाणांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

मुंबई (प्रतिनिधी) : ‘काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध आहे, हे कुठल्या मूर्खाने सांगितलं?’ असा सवाल करत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. 2023 मध्ये आम्ही घटना दुरुस्ती विधेयक आणलं होतं. महिला आरक्षणाचे जनक आम्हीच आहोत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.तसंच, ‘RSS महिलेला संघचालक करणार का?’ असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रत्येक पेपर फुटतो आणि त्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते जबाबदार असल्याची टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पेपर दोन-दोन कोटी रुपयांना विकला जातो. मात्र, कोणालाही शिक्षा होत नाही. हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि कोणालातरी शिक्षा झाली पाहिजे, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं. भाजपच्या काळात हा गोरखधंदा सुरू झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सगळीकडे रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. कुंभमेळ्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट नाही. शक्तिपीठ मार्गात 40-40 टक्के कमिशन घेतलं जात असल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कुंभमेळ्याच्या संदर्भात स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलं नाही. ठराविक लोकांनाच कंत्राटं देण्यात आली आहेत, असंही चव्हाण म्हणाले.दरम्यान, काँग्रेसचं गेल्या 10 दिवसांपासून शिबिर सुरू होतं. या शिबिराच्या समारोपासाठी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी नाशिकमध्ये आले आहेत, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली असून, यामध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कुंभमेळा, शक्तिपीठ मार्ग आणि शेतकरी समस्या यांसह राज्यातील अनेक प्रश्नांवर राहुल गांधी यांनी माहिती घेतल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शक्तिपीठ महामार्ग, कुंभमेळ्याच्या कामांसह शेतकरी प्रश्नांवर राहुल गांधी यांनी माहिती घेतली. गेल्या काही दिवसांपासून कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत.

या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर केंद्रात आवाज उठवणार असल्याचं राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस नेत्यांसोबतची बैठक संपल्यानंतर राहुल गांधी आता शिबिरात सहभागी होणार आहेत. या शिबिरात सहभागी होऊन ते काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरासाठी राज्याच्या विविध भागातून काँग्रेस कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.