वैभव नाईक पुन्हा ACBच्या निशाण्यावर? रत्नागिरीहून कणकवलीला धाडलं महत्त्वाचं पत्र

वैभव नाईक पुन्हा ACBच्या निशाण्यावर? रत्नागिरीहून कणकवलीला धाडलं महत्त्वाचं पत्र

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधूदुर्गाच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागे पुन्हा एसीबीकडून चौकशीचा सासेमीरा सुरु होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी रत्नागिरी एसीबी  कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला त्या संदर्भात पत्र पाठवण्यात आलं आहे. कणकवली शहरातील वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या दोन गाळ्यांसंदर्भातील एसीबीने माहिती मागवली आहे. दरम्यान, विकत घेण्यात आलेले गाळे एकच कि दोन, अशी एसीबीचे पोलीस उपअधिक्षकांचे कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र धाडण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 2002 आणि 2006 मध्ये वैभव नाईक यांच्याकडून या दोन गाळ्याची खरेदी केली होती. 2022 सालापासून वैभव नाईक यांची अपसंपदा प्रकरणी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामार्फेत चौकशी सुरु आहे. 2022 पासून एसीबी कार्यालय रत्नागिरीकडून चौकशी सुरू आहे. चौकशीला कुठलाही विरोध नव्हता, आणि आताही विरोध नाहीये. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक वेळा या चौकशीच्या निमित्ताने माझ्याशी संबंधित असलेल्या अनेक लोकांची चौकशी केली, त्यांचे जबाब घेतले. अधिकारी बदलत असतात, तशा पुन्हा चौकश्या सुरू होत असतात, किंवा राजकीय वातावरण बदललं की पुन्हा चौकश्या सुरू होतात. हे माझ्यावर अन्यायकारक आहे. अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

ज्या चौकश्या असतील त्या चौकशीला आम्ही सामोरे जाऊ. हा कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या चौकश्या असतील, त्या चौकशीला जी उत्तरं असतील, ती ती उत्तरं मी देईन. पाच पाच वर्ष एसीबी विभाग एखाद्या माणसाची चौकशी करतंय, आणि अशा अनेक चौकश्या, माझ्याबरोबर सुरू झालेल्या चौकश्या आज बंद झालेल्या आहेत. फक्त माझीच चौकशी सुरू आहे, हा माझ्यावर अन्याय आहे. आणि या विरोधात सुद्धा मी लढणार आहे. या विरोधात सुद्धा चौकशीला आम्ही सामोरे जाणार आहे. असेही वैभव नाईक म्हणाले.