PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरून पुढे आणलं; पुढे काय घडलं?
मुंबई (प्रतिनिधी) : सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती आणि उद्योजक अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांचा विवाह नुकताच पार पडला. त्यांच्या विवाहानंतर सोमवारी नवी दिल्लीत लग्नाच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हा सोहळा पार पडला.

या स्वागत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. रेवती आणि सारंग यांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या निमित्ताने शरद पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले होते. विशेषतः पवार कुटुंबातील तरुण पिढीचा या सोहळ्यातील वावर लक्षवेधी ठरला.
दरम्यान, या सोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रेवती सुळे यांच्या आई सुप्रिया सुळे यांची पाहुण्यांच्या स्वागतासाठी चांगलीच लगबग दिसून येत आहे. त्या वधू-वरांना भेटण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत होत्या, तसेच त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत होत्या.
याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेजवर वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील तरुण पिढीची पंतप्रधान मोदी यांच्याशी आवर्जून ओळख करून दिली.
सुरुवातीला युगेंद्र पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. ते मोदींच्या पाया पडून पुढे गेले. त्याचवेळी रोहित पवार मात्र त्यांच्या पत्नीसोबत थोडे मागे उभे होते. हे पाहताच सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांचा हात पकडला आणि त्यांना पुढे आणत थेट पंतप्रधान मोदींच्या समोर उभे केले.
यानंतर रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर पवार कुटुंबासोबत पंतप्रधान मोदींचे फोटोसेशनही झाले. याच प्रसंगाचा 38 सेकंदांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रोहित पवार हे महाराष्ट्रातील भाजपप्रणित महायुती सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. विविध मुद्द्यांवरून त्यांनी राज्य सरकारला अनेकदा धारेवर धरले आहे. त्यामुळे भाजपविरोधी राजकारणातील एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
मात्र, दिल्लीतील या कौटुंबिक समारंभात रोहित पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संवादाचा प्रसंग समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.




