धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी! शिवसेना पक्षचिन्हाच्या वादाकडे सर्वांचे लक्ष
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही. मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे.शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिलं असून, त्यावरील याचिकेवर आज पुढील सुनावणी होणार आहे.

मागील सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू मांडली होती. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी निश्चित केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल, अन्यथा ते गोठवलं जाईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आणि पक्षाचं नाव तसेच चिन्ह यावरून दोन्ही गटांमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली. मागील सुनावणीत कपिल सिब्बल यांनी 2018 मधील पक्षांतर्गत निवडणुकांचे पुरावे न्यायालयात सादर करत, त्याच काळात उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती केल्याचाही मुद्दा मांडला होता.आता आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय कोणती भूमिका घेते, याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलं आहे.




