मोदींचा व्हिडिओ फेसबुकवर अचानक ब्लॉक; वाद वाढताच मेटाने निर्णय मागे घेतला
मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ फेसबुकने काही काळासाठी भारतात रिस्ट्रिक्ट केल्याने मोठा वाद निर्माण झाला. हा प्रकार समोर आल्यानंतर मेटाने ही तांत्रिक चूक असल्याचे सांगत संबंधित व्हिडिओ पुन्हा उपलब्ध करून दिला.

माहितीनुसार, जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना उद्देशून 'सेल्फी मोड'मध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता. मात्र, काही वेळानंतर भारतातील युजर्सना हा व्हिडिओ पाहता येत नव्हता. व्हिडिओ उघडण्याचा प्रयत्न केल्यास, कायदेशीर विनंतीचे पालन करत हा व्हिडिओ मर्यादित करण्यात आला आहे, असा संदेश दिसत होता.
या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर मेटाने स्पष्टीकरण देत सांगितले की, हा व्हिडिओ चुकीने रिस्ट्रिक्ट झाला होता. त्रुटी लक्षात आल्यानंतर ती दुरुस्त करण्यात आली असून, व्हिडिओ पुन्हा पूर्ववत करण्यात आला आहे.
दरम्यान, जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी तरुणांशी संवाद साधत पेपर लीकसारख्या प्रकरणांवर कठोर कारवाई केली जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओत त्यांनी परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आल्याची घोषणाही केली होती. सरकार या टास्क फोर्सच्या शिफारशींची अंमलबजावणी करून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.




