म्हातारा होशील पण मागण्या…; मनोज जरांगे-पाटलांवर गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
मुंबई: मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी बीड जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांचे हे आंदोलन निर्णायक असल्याचे सांगितले जात असतानाच, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट जरांगे-पाटील यांच्यावर गंभीर टीका केली आहे. तसेच एकाच मराठा समाजाला तीन वेगवेगळी आरक्षणे मिळू शकतात का? असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी याचे उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.

काय म्हणाले ॲड. सदावर्ते?
ॲड. सदावर्ते यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर सडकून टीका करताना मुंबईला येण्याची धमकी देऊन मुंबईचे जनजीवन विस्कळीत करणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको करून सामान्यांना त्रास देणे चुकीचे असल्याचे म्हटले. मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या संविधानाला सुसंगत नाहीत, असे सांगत त्यांच्या आंदोलनामुळे मराठा बांधवांचा फायदा होत नसून ते तरुणांना चुकीच्या दिशेने नेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पोलीस केसेस आणि मुख्यमंत्र्यांवर टीका
तीन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या आंदोलनातील पोलीस केसेस मागे घेण्याच्या मागणीवर बोलताना सदावर्ते म्हणाले की, पोलिसांना मारहाण झाली असेल तर कायदा अशा केसेस मागे घेण्याची परवानगी देत नाही. अंतरवाली सराटीमध्ये महिला पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी सवाल केला की, या प्रकरणातील मुख्य आरोपींना का अटक झाली नाही? पुढे बोलताना, "तू म्हातारा होशील, हातात काठी येईल, त्यानंतरही तुझी ही मागणी मान्य होणार नाही," असे खडेबोल त्यांनी सुनावले. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत ते ही मागणी मान्य करू शकत नसल्याचे स्पष्ट केले.
५८ लाख नोंदींवरून सवाल
मनोज जरांगे-पाटील वारंवार ५८ लाख नोंदी सापडल्याचा दावा करत असतात, यावरही सदावर्तेंनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. "जनाची नाही तर मनाची तरी लाज असावी," असे म्हणत १८०० सालापासून १९६७ पर्यंतच्या या नोंदींमध्ये ४० वेगवेगळ्या जातींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. जबदस्तीने मिळवलेल्या जात प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी होत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
शरद पवारांना थेट आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी छातीवर हात ठेवून सांगावे की, एकाच समाजाला तीन वेगवेगळी आरक्षणे मिळू शकतात का? असा प्रश्न सदावर्तेंनी विचारला. एकीकडे आर्थिकदृष्ट्या मागासांचे (EWS) आरक्षण मागितले जात असताना दुसरीकडे इतर मागासवर्गीयांचे (OBC) आरक्षण मागितले जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच, आंदोलनात मृत पावलेल्या मराठा समाजातील व्यक्तींच्या कुटुंबीयांना जात-पात न पाहता सरसकट नोकऱ्या देण्यात याव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.




