पांढऱ्या पट्टीच्या वादानंतर सोसायटीने वाळीत टाकल्याचा आरोप; प्रसाद वेदपाठकला मनसेचा पाठिंबा

पांढऱ्या पट्टीच्या वादानंतर सोसायटीने वाळीत टाकल्याचा आरोप; प्रसाद वेदपाठकला मनसेचा पाठिंबा

मुंबई (प्रतिनिधी) : घाटकोपरमधील एका सोसायटीत काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून सुरू झालेला वाद आता राजकीय पातळीवर पोहोचला आहे. इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांनी सोसायटीतील या मुद्द्यावर आक्षेप घेतल्यानंतर मोठी चर्चा रंगली. खासगी सोसायटीच्या आवारातील हा वाद आता थेट राजकीय रंग घेऊ लागला असून मनसेने वेदपाठक यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

प्रसाद वेदपाठक यांनी आपल्याला मिळणाऱ्या धमक्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. आता ते पुन्हा एकदा मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर मनसेची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी प्रसाद वेदपाठक म्हणाले, “आमचा मूळ मुद्दा हा प्रॉपर्टीशी संबंधित होता. सोसायटीमध्ये काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीला आम्ही विरोध केला. नंतर ती पट्टी हटवण्यात आली, मात्र त्यानंतर सुरू झालेल्या घडामोडींना राजकीय स्वरूप देण्यात आले. उलट आमच्याविरोधातच गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.ते पुढे म्हणाले, “मनसेने आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि आमच्या पाठीशी उभी राहिली. प्रवीण छेडा यांनी आमच्याविरोधात आंदोलन केले. मराठी मतदारांची संख्या मोठी असताना अशा प्रकारची भूमिका घेतली गेल्याचे आश्चर्य वाटते. मराठी माणसांसाठी उभा राहणारा पक्ष म्हणून मनसे आमच्यासोबत असल्यामुळे मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे.”

वेदपाठक यांनी आपल्याला धमक्या मिळत असल्याचाही दावा केला. “मला घाबरवण्यासाठी काही लोक घरी येत आहेत. काही जण सतत माझ्या मागावर असल्याचे जाणवते. परिस्थिती अशी झाली आहे की निर्वासितासारखे फिरावे लागत आहे. माझ्या आणि भूमिपुत्रांच्या बाजूने कोणी उभे राहत नाही. संपूर्ण सोसायटीच माझ्या विरोधात गेल्याचे दिसत आहे,” असेही त्यांनी सांगितले.