शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादाच्या पहिल्याच वाक्यात बाळासाहेबांचा उल्लेख; ‘पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला’
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना प्रकरणात निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय योग्य असून, निवडणूक आयोगाला तसा अधिकार असल्याचा जोरदार युक्तिवाद एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी केला. विशेष म्हणजे, आपल्या युक्तिवादाच्या सुरुवातीलाच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला.बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाराचा वापर केला होता, असा दावाही नीरज किशन कौल यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील लोकशाही संपवून सर्व अधिकार स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पक्षात असंतोष निर्माण झाला, असं कौल यांनी न्यायालयात सांगितलं.

बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकार मान्य केले होते. 1999 सालची पक्षाची घटना निवडणूक आयोगासमोर सादर केल्यानंतर आयोगाने त्यामध्ये काही बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. हे बदल मान्य करत बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकार स्वीकारले होते, असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी केला. 2018 साली उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेत बदल केला. मात्र, हा बदल अवैध असल्याचा युक्तिवादही शिंदे यांच्या वकिलांनी केला.
पक्षाची घटना योग्य आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने 2018 सालची घटना योग्य नसल्याचा निर्णय दिला, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी केला.शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात असलेल्या पक्षासोबत युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यामुळे पक्षात असंतोष निर्माण झाला होता, असा दावाही शिंदेंच्या वकिलांनी केला. याच आधारावर एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष मूळ शिवसेना असल्याचा दावा केल्याचं वकिलांनी सांगितलं.
राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवताना विधिमंडळातील आमदारांची संख्या पाहणं गरजेचं असल्याचं यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे शिवसेना प्रकरणात विधिमंडळातील आमदारांची संख्या निवडणूक आयोगाने विचारात घेतली, असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी केला.राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन वेगवेगळे मुद्दे असले, तरी राजकीय पक्षात मतभेद निर्माण झाल्यास पक्ष कुणाचा, हा निर्णय पक्षाच्या संविधानाच्या आधारे घ्यावा लागतो. पक्षाचं संविधान योग्य आहे की अयोग्य आणि त्याच्या आधारे मूळ पक्ष कोणता, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी केला.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख हे पद 2013 पर्यंत अस्तित्वात होतं. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हे पद गोठवण्यात आलं. त्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष हे पद अस्तित्वात आलं.उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष असताना शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. ही जबाबदारी कुणाची होती? पक्षातील या चुका उद्धव ठाकरे यांनी सुधारायला हव्या होत्या, असा युक्तिवादही शिंदेंच्या वकिलांनी न्यायालयात केला.




